Wednesday, March 4, 2026
spot_img

आ. धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे कन्हेरवाडीतील पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी

सरपंच प्रभावती फड यांच्या हस्ते खडीकरण कामाचा शुभारंभ

परळी वैजनाथ : नव महाराष्ट्र न्यूज

परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील देवडा फाटा ते डोबी पाणंद या अत्यंत महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याच्या खडीकरण कामाचा शुभारंभ सरपंच सौ. प्रभावती श्रीराम फड यांच्या शुभहस्ते करण्यात आला. अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता अखेर मार्गी लागल्याने कन्हेरवाडी व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आमदार धनंजय मुंडे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या खडीकरण कामास मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, अशी माहिती युवा नेते कैलास फड यांनी दिली.

हा रस्ता कन्हेरवाडी गावातील शेतकऱ्यांसाठी शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, शेतात जाण्या – येण्यासाठी तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापरात येतो. मात्र रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात धूळ यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक वेळा ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता.

यावेळी बोलताना सरपंच सौ. प्रभावती श्रीराम फड म्हणाल्या, “देवडा फाटा ते डोबी पांदण हा रस्ता कन्हेरवाडी गावासाठी अतिशय आवश्यक होता. हा रस्ता अनेक दिवसांपासून रखडलेला असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागत होत्या. आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत असल्याने ग्रामस्थांचा एक महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून गावाच्या विकासाला चालना मिळेल.”

युवा नेते कैलास फड यांनी आमदार धनंजय मुंडे यांचे आभार मानत सांगितले की, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच आमदार धनंजय मुंडे यांचे धोरण आहे. कन्हेरवाडी येथील देवडा फाटा ते डोबी पानंद रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आमदार धनंजय मुंडे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज या रस्त्याच्या खडीकरण कामाला सुरुवात झाली असून, याचा थेट फायदा शेतकरी बांधवा होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles