Saturday, February 28, 2026
spot_img

कामगार – विरोधी नवे चार कामगार कायदे तात्काळ रद्द करा – इंटकचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे कामगार, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. केंद्र शासनाने कोणतीही पूर्वचर्चा न करता लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांच्या निषेधार्थ तसेच कामगार विरोधी धोरणे व कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

या आंदोलनात विविध कामगार संघटना, कर्मचारी संघटना, आशा, अंगणवाडी, एमडीएम कर्मचारी तसेच इतर क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान निदर्शने, घोषणाबाजी व सभेद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर निवेदन सादर करून कामगारांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
चार नवीन कामगार संहिता तात्काळ रद्द कराव्यात.
बियाणे विधेयक व वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावेत.
अणुऊर्जा क्षेत्रातील खाजगीकरणास प्रोत्साहन देणारी धोरणे रद्द करावीत.
मनरेगा योजना बळकट करावी व संबंधित ग्रामीण कायदे मागे घ्यावेत.
रोजगार व विमा क्षेत्रातील १००% थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय मागे घ्यावा.
‘विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक २०२५’ मागे घ्यावे.

सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त पदे तात्काळ भरावीत.
अंगणवाडी, आशा व एमडीएम कर्मचाऱ्यांना नियमित करून सरकारी कर्मचारी दर्जा द्यावा. एनएचएम डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवा द्यावी.
यावेळी इंटकचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले म्हणाले की, “मागील दहा वर्षांत शासनाने घेतलेले अनेक निर्णय कामगारविरोधी असून उद्योगपतीधार्जिणे आहेत. नवीन कामगार संहितांमुळे कामगारांचे विद्यमान हक्क कमी होत असून कंत्राटीकरण व खासगीकरणाला चालना मिळत आहे. त्यामुळे रोजगार सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत आहे. शासनाने कामगार संघटनांशी सखोल चर्चा करूनच निर्णय घ्यावेत. कामगार, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आम्ही लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवू. शासनाने आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी; अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”

या आंदोलनात काँग्रेसचे दादासाहेब मुंडे, सखाराम बेंगडे (इंटक जिल्हा सचिव), संदीप झिंजुर्के (जिल्हा उपाध्यक्ष), मारुती आगाज, सद्दाम शेख, सकलेन शेख (उपतालुका अध्यक्ष, बीड), भीमराव कुटे, शेख आमेर पाशा (शेर-ए-हिंद संस्था), सेवानिवृत्त ईपीएस कर्मचारी समन्वय समितीचे विभागीय व जिल्हाध्यक्ष डॉ. संजय तांदळे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डी. जी. तांदळे, आप जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक अशोक येडे, लेक लाडकी अभियानचे जिल्हाध्यक्ष बाजीराव ढाकणे, प्राचार्य राजकुमार कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

या आंदोलनात काँग्रेस-इंटक संघटना, ईपीएस ९५ पेन्शनर्स संघटना, किसान सभा, बांधकाम कामगार संघटना, लाल बावटा कामगार युनियन, असंघटित कामगार संघटना, आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण आहार संघटना, एसएफआय, डीवायएफआय, जनवादी महिला संघटना आदी विविध राष्ट्रीय स्तरावरील संघटनांचा सहभाग होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles