वनविभागाचे अधिकारी फोन घेईनात : डॉ. गणेश ढवळे
बीड (प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी शिवारातील वनपरिसरात आज बुधवार (दि.१२) सकाळी सुमारास काळवीट मृतावस्थेत आढळून आले. काळवीटाच्या शरीरावर इतरत्र कुठेही गंभीर जखमा नसल्याचे दिसून आले, मात्र पोटाचा भाग छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीट ठार झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी घटनेची माहिती मिळताच बीड वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. डॉ. ढवळे यांनी सांगितले की, “पूर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे हे अशा घटनांवर तत्काळ प्रतिसाद देत आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवत. परंतु सध्याचे अधिकारी सांगुळे यांनी फोन न उचलल्याने तातडीने कार्यवाही होऊ शकली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.”

यानंतर बदली होऊन गेलेले वनपाल बहिरवाळ यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी नव्या वनपाल विजय केदार यांचा मोबाईल क्रमांक दिला. त्यावरून डॉ. ढवळे यांनी त्यांना घटनेची माहिती देत वनविभागाने तत्काळ चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली. वनकर्मचारी येईपर्यंत कुत्र्यांनी काळवीटाचे लचके तोडु नये म्हणून लिंबाच्या झाडाच्या पानांनी झाकुन ठेवले.
या घटनेच्या वेळी नेकनूर पोलिस स्टेशनचे प्रशांत क्षीरसागर, तसेच महाजनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वंभर गिरी, विशाल घरत, संदिप घरत, ऋषिकेश घरत, शंकर घरत, सतिश घरत आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील काळवीट, हरीण यासह इतर वन्यजीव प्राण्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या सर्व घटनांमध्ये तात्काळ दखल घेऊन वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात विशेष लक्ष घालून वन्यजीव प्राण्यांची सुरक्षा वाढवन्यासाठी विशेष लक्ष घालावे.
—— डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर



