सिद्धेश्वर गिरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर गिरी यांची गोसावी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीड तालुक्यातील सुलतानपूर येथील रहिवासी असलेले सिद्धेश्वर गिरी हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांतून लोकांमध्ये कार्यरत आहेत. तसेच समाजातील सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणीला ते कायम उपलब्ध असतात.
गोसावी समाजाच्या हक्कांसाठी व संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत असलेल्या गोसावी सेनेत जिल्हा पातळीवर नवी नेतृत्वशैली मिळावी या हेतूने नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते सिद्धेश्वर गिरी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीनंतर सिद्धेश्वर गिरी यांनी विश्वास व्यक्त करताना सांगितले की, “गोसावी समाजातील तरुणांना शिक्षण, रोजगार व स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. समाजातील ऐक्य आणि संघटनशक्ती वाढविणे हीच माझी प्राथमिकता असेल.”
सिद्धेश्वर गिरी यांच्या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सुलतानपूरसह संपूर्ण बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक बांधवांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बीड जिल्ह्यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्याचे नवीन कार्यकारिणीची निवड लवकरच तालुका निहाय दौरा करून बैठका घेऊन सर्वानुमते करण्यात येईल असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.



