Monday, March 2, 2026
spot_img

चौसाळा परिसरात हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीला शेतकऱ्यांची वाढती पसंती

कमी वेळेत जमिनीलगत; एकसारखी व अचूक ऊस तोडणी होत असल्याने शेतकऱ्यांची पसंती

चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज

बीड तालुक्यातील चौसाळा परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढताना दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने ऊस तोडणी करताना भासणाऱ्या अडचणी, मजुरांची टंचाई, वाढते मजुरी दर आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता हार्वेस्टर हे शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी पर्याय ठरत आहे.

हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केल्यानंतर जमिनीलगत एकसारखी आणि अचूक तोडणी होते. यामुळे ऊसाच्या खोडव्याला कमी नुकसान होते आणि पुढील हंगामात खोडवा अधिक जोमाने फुटण्यास मदत होते. परिणामी ऊसाचे उत्पादन वाढण्यास हातभार लागतो, असे शेतकरी सांगतात. पारंपरिक तोडणीमध्ये अनेकदा ऊस उंचावर तोडला जात असल्याने उत्पादनावर परिणाम होत असे; मात्र हार्वेस्टरमुळे ही समस्या दूर झाली आहे.

हार्वेस्टरची कार्यक्षमता लक्षवेधी आहे. कमी वेळेत मोठ्या क्षेत्रातील ऊस तोडणी पूर्ण होत असल्याने ऊस वेळेत साखर कारखान्यापर्यंत पोहोचवणे शक्य होते. त्यामुळे ऊस ताज्या स्थितीत कारखान्यात दाखल होत असून साखर उताऱ्यावरही सकारात्मक परिणाम होत असल्याचे निरीक्षण शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करतानाच शेतातील पाचटाची कुट्टी तयार होत असल्याने शेतकऱ्यांना आणखी एक महत्त्वाचा लाभ मिळत आहे. पाचट जाळण्याची गरज नसल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते, तसेच ही कुट्टी जमिनीत मिसळल्यास सेंद्रिय पदार्थ वाढून जमिनीची सुपीकता सुधारते.

सध्या ग्रामीण भागात मजुरांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घटली आहे. अशा परिस्थितीत हार्वेस्टरमुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. एका दिवसात पाच टोळ्या जितकी ऊस तोडणी अनेक मजूर मिळून करतात, त्याहून अधिक तोडणी हार्वेस्टर काही तासांत करत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचत आहेत.

एकूणच आधुनिक यांत्रिकीकरणामुळे ऊस शेती अधिक शाश्वत, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक ठरत असून हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी ही काळाची गरज बनत चालली आहे. भविष्यात चौसाळा परिसरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात हार्वेस्टरचा वापर अधिक प्रमाणात वाढेल, असा विश्वास शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles