चौसाळा येथील आठवडी बाजारात एकाच दिवशी 19 मोबाईल चोरीला
चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज
बुधवार, दिनांक 17 डिसेंबर रोजी बीड तालुक्यातील चौसाळा येथील आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. एकाच दिवशी जवळपास 19 जणांचे मोबाईल फोन चोरीस गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी होण्याची ही चौसाळा शहरातील पहिलीच घटना असून यामुळे पोलिसांच्या समोर चोरांनी एक प्रकारे आव्हानच उभे केले आहे.
या चोरीच्या घटनांमध्ये हिंगणी खुर्द येथील माजी सरपंच रमेश तांदळे यांचा सुमारे 15 हजार रुपये किमतीचा, दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेला मोबाईल चोरीस गेला आहे. तसेच चौसाळा येथील रामकृष्ण मेडिकलचे संचालक निशिकांत देशमुख यांचा सुमारे 40 हजार रुपये किमतीचा, दोन महिन्यांपूर्वीच घेतलेला मोबाईलही चोरट्यांनी लंपास केला आहे. याशिवाय चांदशी दवाखान्याचे डॉक्टर हलदार यांच्यासह अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीस गेल्याची घटना चौसाळा येथील आठवडी बाजारात घडली आहे.
या प्रकरणी काही नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून उर्वरित नागरिक तक्रार देण्याच्या तयारीत आहेत. एकाच दिवशी मोठ्या संख्येने मोबाईल चोरीस गेल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आठवडी बाजारात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांकडून पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच चोरीला गेलेले मोबाईल शोधून द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -