बीड तालुक्यातील मौजे मुर्शदपूर – तिप्पटवाडी या दोन गावांमधील अनेक वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता अखेर खुला झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा रस्ता केवळ मातीचा नव्हता, तर तो शेती, श्रम, संघर्ष आणि जगण्याच्या वाटेचा होता. तो बंद असताना दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अनेक दिवस अडथळ्यांत अडकले होते. आता मात्र त्या अडथळ्यांना वाट मोकळी झाली आहे. ही अडथळ्यांची वाट बीड चे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पुढाकार घेतल्याने मोकळी झाली आहे त्यामुळे दोन्ही गावच्या शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.
राज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून सोडवाव्यात, हा स्पष्ट दृष्टिकोन स्वीकारला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनीही प्रलंबित प्रश्न संवादातून सोडवण्यावर भर देत लोकाभिमुख प्रशासनाची दिशा निश्चित केली आहे. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनामुळेच अशा अनेक जुन्या प्रश्नांना गती मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील मुर्शदपूर – तिप्पटवाडी दरम्यानचा शिवरस्ता खुला करण्याची प्रक्रिया पुढे सरकली . शेतीसाठी अत्यावश्यक असलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना पिके वाहतूक करताना , जनावरांची ने-आण करताना आणि दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणी येत होत्या . “रस्ता बंद म्हणजे शेत बंद” अशी परिस्थिती अनेक शेतकऱ्यांनी अनुभवली होती.
सुनील गाहिनीनाथ जगताप, अनिल गाहिनीनाथ जगताप, सोमेश्वर ज्ञानोबा जगताप आणि बाबासाहेब ज्ञानोबा जगताप यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे शिवरस्ता खुला करून देण्याबाबत अर्ज सादर केला होता. तर या प्रकरणातील दुसऱ्या बाजूचे शेतकरी विश्वंबर आनंदा रोडे, चंद्रसेन पाटीलबुवा रोडे, गोविंद पाटीलबुवा रोडे, रंजीत सुखदेव मस्के, सखाराम जगताप आणि धर्मराज जगताप यांनीही आपली भूमिका मांडली होती.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. महसूल नोंदी, कायदेशीर बाबी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा सखोल अभ्यास करून समोपचाराच्या मार्गाने तोडगा काढण्यात आला. या वेळी तिप्पटवाडी गावचे सरपंच विष्णु प्रल्हाद जायभाये आणि मुर्शदपूर गावचे माजी सरपंच जावळे हेही उपस्थित होते.
या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या भावना शब्दांत उतरू लागल्या.
हा रस्ता खुला होईल अशी आम्हाला आशा होती, पण इतक्या शांततेत आणि समजुतीने तोडगा निघेल असं वाटलं नव्हतं. आता शेतीकाम करताना मनावरचं ओझं उतरलं आहे. —- सुनील गाहिनीनाथ जगताप
वाद वाढवण्यापेक्षा समजूत काढली गेली. आमचंही म्हणणं ऐकलं गेलं, त्याचा आदर ठेवला गेला. रस्ता खुला झाला म्हणजे गावात पुन्हा सलोखा आला. —- विश्वंबर आनंदा रोडे
वर्षानुवर्षे हा रस्ता बंद होता. पावसाळ्यात शेतात जाणं अवघड व्हायचं. आज वाट मोकळी झाली आहे, म्हणजे उद्याचं आयुष्यही मोकळं झालं आहे. —- सोमेश्वर ज्ञानोबा जगताप