पाटोदा: मोठमोठ्या कंपन्या, उत्पादक , वितरक आपापल्या प्रतिष्ठानाची जाहिरात करण्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या व्यक्तिमत्त्वांना ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून नियुक्त करतात. नामांकित व्यक्तींच्या नावाने जाहिरात केल्या जाते. ग्रामीण भागात ‘ब्रँड अँबेसिडर’ हा प्रकार नेमका काय असतो याची माहिती नसते ,अशा स्थितीत पाटोद्यासारख्या ग्रामीण भागातील एका तरुण उद्योजकाची ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संचेती रुग्णालयाने ही निवड केली आहे.
सय्यद शहनवाज अब्दुल्ला या तरुणाने नजीकच्या काळात बांधकाम आणि सलग्न व्यवसायात गरुड झेप घेतलेली आहे. व्यवसाय सांभाळत सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले शहनवाज रुग्णसेवा करण्यात आघाडीवर असतात. रुग्ण्सेवेच्या निमित्ताने त्यांचा पुण्याच्या संचेती रुग्णालयाशी संपर्क झाला. रुग्णांना कमी खर्चात उपचार मिळावेत यासाठीच्या प्रयत्नात त्यांचा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. पराग संचेती यांच्याशी संपर्क आला.
तडफदार आणि सेवाभावी वृत्ती असलेल्या सय्यद शहनवाज यांचे सामाजिक कार्य डॉ. संचेती यांना भावले. विविध प्रतिष्ठानं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून निवडतात. मात्र संचेती यांनी रुग्णसेवा करणाऱ्या शहनवाज या तरुणाची रुग्णालयाचे ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणून निवड केली आहे. पाटोदा तालुक्याला या निमीत्ताने बहुमान मिळाला आहे.



