Monday, March 2, 2026
spot_img

बीड जिल्ह्यातील नाथापूर – पिंपळनेर रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो जप्त

बीडच्या महसूल विभागाची धडक कारवाई

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

बीड शहरा जवळील नाथापूर – पिंपळनेर रोडवरील खंडेश्वरी मंदिरजवळ, पाॅलिटेक्निक काॅलेज परिसरात महसूल विभागाने 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजता गुप्त माहितीच्या आधारे राबविलेल्या धडक कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. सदरील तांबड्या रंगाचा टेम्पो क्रमांक MH:16 AY:8512 यामध्ये अंदाजे १ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाहतूक परवाना विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले. वाहन मालकाचे नाव आरबाज बेग रईस बेग रा. खासबाग ता. जि. बीड असल्याचे चालकाने सांगितले.

महसूल प्रशासनाला काही दिवसांपासून सिंधफणा नदीकाठी कुर्ला, कुक्कडगाव, भाटसांगवी परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी मिळत होत्या त्यानुसार पथकाने रात्री उशिरापर्यंत गुप्त पाळत ठेवली. संशयित वाहनाने वेगाने पलायनाचा प्रयत्न करताच पथकाने 5 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. अखेर नाथापूर – पिंपळनेर रोडवर सापळा रचून वाहनाला वेढा देत पकडण्यात यश आले. अचानक तपासणीमध्ये कोणतीही परवानगी किंवा परवाना नसताना वाळूची वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. पथकाने वाहन व वाळू जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी ते तहसील कार्यालय बीड येथे लावण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा व वाळू नियमांनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई सुरू आहे .

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आवाहन केले की, कोणीही बेकायदेशीर वाळू उत्खनन, वाहतूक अथवा विक्री करू नये. कोणाला याबाबत माहिती असल्यास प्रशासनाकडे त्वरित कळवावी, वाळू माफियांना पाठीशी घालण्यात येणार नाही. तसेच अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत सांगितले की, अवैध उत्खननामुळे जलस्रोत आणि पर्यावरण धोक्यात येते. कायद्याचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी इशारा देत म्हटले की सिंधफणा परिसरात तपास मोहिमा सुरू राहतील. कुणीही गैरप्रकारात सामील असल्यास कठोर कारवाई टाळता येणार नाही. बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले की, अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने राबविल्या जाणार आहेत. कोणीही अवैध रित्या वाळूची वाहतूक करू नये, कायद्याचे पालन करावे, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास महसूल विभागास कळवावे.

ही कारवाई जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, ग्राम महसूल अधिकारी दादा शेळके, विकास ससाणे, विजय बहीर, विलास शिंदे, एम. व्ही. खांडेकर, यशवंत सानप यांच्या पथकाने केली. बीड जिल्हा प्रशासन सज्ज असून अशा धाडसी कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत, असे जिल्हा गौण खनिज अधिकारी नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles