महासांगवीच्या केळीची आता ‘इराण’ला भुरळ; ७० गुंठ्यातून थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झेप
पाटोदा : नव महाराष्ट्र न्यूज
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. महासांगवी येथील तरुण शेतकरी प्रमोद नवनाथ गर्जे यांच्या शेतातील केळीने आता थेट सातासमुद्रापार ‘इराण’च्या बाजारपेठेत धडक मारली आहे. या यशामुळे स्थानिक केळी उत्पादकांसाठी जागतिक बाजारपेठेची दारे उघडली गेली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
नियोजनाचे ‘मॉडेल’ प्रमोद गर्जे यांनी आपल्या ७० गुंठे क्षेत्रात केले असून ठिबक सिंचनाचा वापर करून केळीची लागवड केली.
७ बाय ५ फूट या अंतरावर त्यांनी एकूण २००० रोपे लावली होती. एका रोपासाठी साधारण १५० रुपयांपर्यंत खर्च आला असून, पिकाच्या वाढीसाठी खतांचे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अचूक नियोजन त्यांनी सुरुवाती पासूनच केले होते. दर्जेदार उत्पादन आणि हमखास दर विशेष मशागत आणि नियोजनामुळे केळीच्या एका गडाचे वजन सरासरी २५ किलोपर्यंत भरले आहे. या दर्जेदार मालाची गुणवत्ता पाहून आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी या केळीला १७ रुपये प्रति किलो इतका भाव दिला आहे. खतांमध्ये प्रामुख्याने १२:६१:००, १३:००:४५ यांसारखी विद्राव्य खते, सूक्ष्मद्रव्ये (बोरॉन, झिंक), कोंबडी खत आणि शेणखताचा समतोल वापर केल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
इराणला निर्यात आणि नव्या संधी या केळीची प्रत आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याने ती थेट इराण देशात निर्यात केली जात आहे. “शेतीत केवळ पारंपरिक पिके घेऊन चालणार नाही, तर नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. बाजाराची गरज ओळखून उत्पादन घेतल्यास जागतिक बाजारपेठ गाठणे कठीण नाही,” असे मत प्रमोद गर्जे यांनी व्यक्त केले. महासांगवी सारख्या ग्रामीण भागातून केळीची निर्यात होणे, ही केवळ पाटोदा तालुक्यासाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, हा यशस्वी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -