लोणीघाट येथे लिंबागणेश महसूल मंडळाची आढावा बैठक संपन्न
लिंबागणेश : नव महाराष्ट्र न्यूज
बीड तालुक्यातील लिंबागणेश महसूल मंडळ विभागातील लोणीघाट येथे मंडळस्तरीय महसूल आढावा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोणीघाट जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
“शासन आपल्या दारी” या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महसूल प्रशासनाने थेट गावपातळीवर उपस्थित राहून शेतकरी व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. हनुमान मंदिर सभागृहात झालेल्या या बैठकीचे नेतृत्व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले.
बैठकीदरम्यान महसूल दाखले, फेरफार, वारसा हक्क, जमीन नोंदी, शेतीविषयक अडचणी, पीकविमा, अॅग्रीस्टॅक तसेच विविध शासकीय योजनांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील रस्त्यांबाबतची प्रकरणे तसेच बळीराजा शेतकरी सन्मान योजनेसंदर्भातील मुद्द्यांवर तहसीलदारांनी नियमांनुसार तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनांनुसार तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन अधिक गतिमान व नागरिकाभिमुख पद्धतीने कार्यरत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
या वेळी “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत विविध प्रमाणपत्रे, महसूल दाखले, श्रावण बाळ योजनेचे लाभपत्र, कुणबी व डोमिसाईल प्रमाणपत्रे तसेच फार्मर आयडीचे वितरण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना तालुका अथवा जिल्हा मुख्यालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही.
या बैठकीस लिंबागणेश मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, ग्राम महसूल अधिकारी गणपत पोतदार, नारायण दराडे, विपुल बनकर, शेख गफूर, अक्षय शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी नितेश माळी, एस. डी. गायकवाड, एच. एन. दहे, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन भालशंकर व आगलावे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, माजी जि. प. सदस्य अशोक लोढा, सरपंच प्रतिक्षा जाधव, उपसरपंच सुमन जाधव, ग्रामपंचायत सदस्य मैनाबाई सातपुते, आशाबाई जाधव,राम जय जाधव, त्रिंबक जाधव, विनायक जाधव , बाबासाहेब जाधव, उत्तरेश्वर जाधव, बाबुराव जाधव, सुरेश मिटकरी, जयसिंग जाधव, तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महसूल प्रशासन थेट गावात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. अशा आढावा बैठकींमुळे प्रशासन व नागरिकांमधील संवाद अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -