मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने येण्याऐवजी गाडीने येऊन रस्त्याची वाट लागलेली पहावी
पाटोदा : नव महाराष्ट्र न्यूज
पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर श्री संत वामनभाऊ यांचा ५० वा पुण्यतिथी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सोहळा राज्यातील भाविकांसाठी श्रद्धेचा कार्यक्रम मानला जातो. तसेच या सोहळ्यासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकाणी – ठिकाणी रस्त्यावररील डांबराचा स्तर उघडलेला आहे त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी हेलिकॉप्टरने येण्यापेक्षा गाडीने येऊन सदरील रस्त्याची झालेली दुरावस्था पहावी म्हणजे त्यांना जनतेचे हाल लक्षात येतील अशी मागणी परिसरातील भाविकांमधून व जनतेतून होत आहे.
मात्र एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांसह पायी जाणाऱ्या भाविकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. लाखो भाविक या पुण्यतिथी सोहळ्यासाठी गडावर येणार असताना आणि मान्यवरांची उपस्थिती निश्चित असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर “मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने येण्याऐवजी गाडीने यावे व गहिनीनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था प्रत्यक्ष अनुभवावी” अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे. पुण्यतिथी सोहळ्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील जनतेतून करण्यात येत आहे.