Monday, March 2, 2026
spot_img

सद्भावना सायकल यात्रेचे पाटोदा शहरात उत्स्फूर्त स्वागत

पाटोदा : नव महाराष्ट्र न्यूज

स्नेहालय संस्थेच्या युवा निर्माण प्रकल्प व समविचारी सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र व्यापी ‘सद्भावना सायकल यात्रा क्र. ११’ चे पाटोदा शहरात मोठ्या उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. “प्रत्येक माणूस मोलाचा” हा संदेश समाजात रुजविण्यासाठी निघालेल्या या यात्रेचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले. पाटोदा शहरात यात्रेचे स्वागत करताना नगराध्यक्ष पती राजू भैय्या जाधव, गटनेते बळीराम पोटे, माजी नगरसेवक बालाजी जाधव, माजी सभापती संदीप जाधव, बाळुशेठ जाधव, नामदेव जाधव, युवा नेते जितेंद्र भोसले, आझाद पत्रकार गणेश शेवाळे, यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी यात्रेतील सहभागी सदस्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करत सद्भावना, बंधुता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. समाजात वाढत चाललेली धार्मिक तेढ, द्वेष, हिंसा व तणाव कमी करून जात- धर्म-भाषा-लिंग अशा सर्व भेदांपलीकडे जाऊन माणुसकीचा विचार प्रबळ करणे, हा या सद्भावना सायकल यात्रेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र धर्म जागवावा, सौहार्द सशक्त करावे आणि राष्ट्रधर्म वाढवावा या हेतूने ही यात्रा राबविण्यात येत असून, तरुणाईशी थेट संवाद साधत सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

पाटोदा येथे यात्रेतील सहभागी सदस्यांसाठी जेवण व चहा-पाण्याची उत्तम व्यवस्था माजी नगरसेवक बालाजी जाधव यांनी केली. या व्यवस्थेमुळे यात्रेतील सहभागी सदस्यानी समाधान व्यक्त करत पाटोदा शहरवासीयांचे व आयोजकांचे आभार मानले. ही सद्भावना सायकल यात्रा ३० डिसेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ (स्वामी विवेकानंद जयंती) या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागांतून मार्गक्रमण करीत असून, पहिल्या टप्प्यात मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सद्भावनेचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे आयोजकांनी सांगितले. सद्भावना, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले असून, नागरिकांनी व विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles