चुकीचे पंचनामे आणि तुटपुंज्या मदतीवर बोळवण
बीड : सरसगट मदतीच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाची पाने पुसण्याचे काम सरकारकडून करण्यात आले असून जिल्ह्यात लाखो हेक्टर शेती क्षेत्र हे बागायती असताना बागायती मदतीपासून वंचीत ठेवण्याच्या संतापजनक प्रकार जिल्ह्यात घडला असून खरडून गेलेल्या जमिनी व विहिरीचे वास्तवीक पंचनामे करण्यात यावे, भावांतर योजना तर दूरच पण किमान शासकीय हमीभावाने सोयाबीन, कापूस खरेदी केंद्र सुरू करावे यासह इतर मागण्याकरिता बलिप्रतिपदा दिनी किसान सभा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती किसान सभेने दिली आहे.
सप्टेंबर मधील अतिवृष्टी आणि महापूर यामुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्राचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे.जिरायती, बागायती शेती क्षेत्र आणि त्यावरील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या विदारक परिस्थितीत प्रशासनाने जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या कमांड एरिया अर्थात सिंचन क्षेत्र असलेली 2 लाख हेक्टर शेती क्षेत्र हे बागायती असताना जिल्हा प्रशासनाने केवळ 18 हजार एवढेच क्षेत्र बागायती दाखवल्याने बागायती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील जिरायती क्षेत्राप्रमाणे तुटपुंज्या मदतीवर बोळवण करण्याचे काम प्रशासन आणि सरकारने केले आहे. बुजलेल्या, खचलेल्या विहिरीसाठी देखील अल्प मदत करत वाहून व खरवडून गेलेल्या शेतीची कामे देखील रोजगार हमी योजनेतून करणार असे सांगण्यात आले मात्र अद्याप ही यावर कोणतेही कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात काही अंशी शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस या सारखे कमी उतारा आलेले पीक देखील बाजारात कवडीमोल विकावे लागत असल्याने शासनाने तात्काळ हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करावी. घोषीत केलेल्या कोट्यवधी रकमेपैकी दिवाळी गोड करण्याच्या नावाखाली केवळ 45 रु गुंठा एवढी सरकारी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात मिळत असल्याने सरकारी मदत म्हणजे जखमेवर मीठ लावण्यासारखी असून या परिस्थितीत किसान सभा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहे.
चौकट
42 रुपये गुंठ्यानं हेक्टरी 4281 रुपये ची अतिवृष्टीची मदत काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे जी अत्यंत तुटपुंजी व तोंडाला पान पुसणारी आहे.बुजलेल्या, खचलेल्या विहिरी यासाठी एमआरजीएस अंतर्गत केवळ 30 हजार रु मदत, या विरोधात तर कर्जमाफी आणि हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करा यासाठी किसान सभा बलिप्रतिपदेच्या दिवशी दि 22 ऑक्टोबर रोजी इडा पिडा टळो बळीच राज्य येवो यासाठी गावा-गावात, चौका-चौकात शेतकरी एकत्र येऊन सरकारविरोधी आंदोलन करणार आहेत.
एड.अजय बुरांडे
जिल्हाध्यक्ष
किसान सभा बीड



