बीड शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांवर वितरित करण्यात आलेली ज्वारी अत्यंत निकृष्ट व खराब दर्जाची असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शिधापत्रिका धारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. इतकी खराब ज्वारी दुकानात आली आहे की जनावरंही ती खाणार नाहीत. मग ती माणसांनी कशी खावी? असा संतप्त सवाल लाभार्थ्यांकडून केला जात आहे.
सदर ज्वारीत कुजलेपणाचा वास येत असून दाणे काळवंडलेले, किड लागलेले आणि धुळीने माखलेले असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर ज्वारी हातात घेताच भुसा होऊन जाते. ही ज्वारी स्वयंपाकासाठी पूर्णतः अयोग्य असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यावरच गरीब व गरजू कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असताना असा निकृष्ट धान्यपुरवठा होणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या प्रकाराबाबत लाभार्थ्यांनी दुकानधारकांकडे तक्रार केली असता, वरूनच असा साठा आला आहे असे उत्तर देण्यात येत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दोष नेमका कोणाचा, पुरवठा यंत्रणेचा की साठवणुकीतील हलगर्जीपणाचा याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने तत्काळ नमुने तपासून निकृष्ट ज्वारीचा साठा जप्त करावा व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, खराब ज्वारीचे वितरण तात्काळ थांबवून दर्जेदार धान्य उपलब्ध करून द्यावे; अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही लाभार्थ्यांनी दिला आहे.