Beed News: डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी आरोग्य जनजागृती व सर्वेक्षण
बीड : तालुक्यातील मौजे ढेकणमोहा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ व जिल्हा हिवताप अधिकारी श्री विजयसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया या साथीच्या आजारांविषयी जनजागृती व सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश गावातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे आणि डासजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे हा होता.
या प्रसंगी जिल्हा पर्यवेक्षक संजय धस यांनी उपस्थित नागरिकांना मौल्यवान आरोग्य मार्गदर्शन दिले. तसेच आरोग्य सहाय्यक पवळ, सगरे, आरोग्य कर्मचारी पठाण, शगीर, सानप, करपे, भिलारे, जाधव, मेखले, सातपुते, गव्हाणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान ढेकणमोहा गावात कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. दूषित पाण्याच्या कंटेनरमध्ये अबेट औषध टाकण्यात आले, तर काही कंटेनर रिकामे करण्यात आले. प्रत्येक घरात जाऊन नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया प्रतिबंधक उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या.
नागरिकांना दर आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” पाळण्याचे, तसेच मच्छरदाणी, लिक्विड, अगरबत्ती किंवा नैसर्गिक उपाय (उदा. लिंबाची पाने) वापरण्याचे आवाहन करण्यात आले. नाल्या नियमितपणे साफ ठेवाव्यात, पाण्याच्या हौदात व खड्ड्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत, अशीही सूचना देण्यात आली.
याशिवाय, सरपंच आणि ग्रामपंचायतीला तात्काळ धूर फवारणी (फॉगिंग) करण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून डासांची उत्पत्ती आटोक्यात येईल आणि कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येईल.
या उपक्रमाद्वारे गावात स्वच्छतेचे महत्त्व आणि डासजन्य आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -