Thursday, February 26, 2026
spot_img

अतिवृष्टीच्या पुरात वाहून गेलेल्या चौसाळा येथील तरुणाचा दोन महिन्यांनी सापडला मृतदेह

चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज

यावर्षी बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. दिनांक 27 सप्टेंबर रोजी बीड तालुक्यातील चौसाळा शहरालगत चौसाळा वाढवणा – पिंपळगाव रोडवर असलेल्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता. दिनांक 27 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान चौसाळा येथील उच्चशिक्षित प्रगतशील शेतकरी स्वप्निल विक्रम शिंदे (वय : 33) हे चौसाळा वाढवणा – पिंपळगाव रोडवर आपल्या शेतात राहत असलेल्या घराकडे दुचाकी वर निघाले होते. नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते दुचाकीसह नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.

दुसऱ्या दिवशी दिनांक 28 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत तो घरी न आल्याने घरच्यांनी माहिती घेऊन नातेवाईकांना कळवले व घरच्यांसह, नातेवाईक, मित्रपरिवार व गावकऱ्यांसह सर्वांनी शोध सुरू केला. चौसाळा शहरालगत असलेल्या नदीत काही अंतरावर त्याच्याकडे असलेली दुचाकी सापडली. यावेळी आपत्ती निवारणासाठी जिल्ह्यात असलेल्या पथकांना या ठिकाणी बोलावून त्यांच्यामार्फत शोध मोहीम सुरू केली. यावेळी जिल्हा आपत्ती निवारणाच्या पथकासह, नातेवाईक, मित्रपरिवार, गावकरी, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याकडून ही शोध मोहीम सलग तीन दिवस सुरू होती. घटनास्थळापासून जवळपास 15 ते 20 किमी पर्यंत सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु त्याचा शोध लागला नाही शेवटी तीन दिवसानंतर प्रशासनाच्या वतीने शोध थांबवण्यात आला. दरम्यानच्या कार्यकालात आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी शिंदे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते.

दिनांक 23 नोव्हेंबर रविवार रोजी चौसाळा बायपास जवळील पुलाच्या खाली एका खड्ड्यातील झुडपात एक मानवी शरीराचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्या परिसरात ऊसतोड मजूर व मासे पकडणाऱ्या व्यक्तीस दिसला त्यांनी त्या घटनेची माहिती त्यांनी सदरील माहिती त्यांच्या नातेवाईकांना मोबाईल द्वारे कळवले त्यानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी येऊन पाहिले असता अंगावरचे कपडे आणि त्यांच्या खिशामध्ये असलेला मोबाईल यावरून हा मृतदेह स्वप्निल शिंदेचाच असल्याची ओळख पटली. जवळपास दोन महिन्यांनी स्वप्निल शिंदे चा मृतदेह सापडला आहे. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता चौसाळा येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्निल हा आई- वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई – वडील, पत्नी व सहा वर्षाचा एक लहान मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे चौसाळा शहरासह परिसरातील सर्व गावांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles