Monday, March 2, 2026
spot_img

Big Breaking : धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जवळ डिझेलच्या टँकरचा स्फोट

महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर शुक्रवार 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:15 च्या दरम्यान बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाली आणि मांजरसुंबा घाटाच्या दरम्यान कोळवाडी गावाजवळ डिझेलने भरलेल्या टँकर आणि कंटेनरचा अपघात झाला. त्यामध्ये डिझेल ने भरलेल्या टँकरचा भीषण स्फोट झाला. स्फोट होताच खूप मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता एवढी मोठ्या प्रमाणात होती की, राष्ट्रीय महामार्ग तब्बल दोन तास ठप्प होता.

प्राथमिक माहितीनुसार, पेट्रोल पंपावर डिझेल घेऊन जाणारा हा टँकर धुळे – सोलापूर महामार्गावरून जात होता. मांजरसुंबा आणि कोळवाडी गावाजवळ कंटेनरने डिझेलच्या टँकरला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत आहे. अपघातानंतर डिझेलचा टँकर काही अंतरापर्यंत रस्त्यावर घसरत गेला. यामुळे टँकरचा प्रचंड मोठा स्फोट झाला आणि आगी बरोबरच धुराचेही लोट मोठ्या प्रमाणात घटनास्थळी पसरले होते.

स्फोटानंतर टँकरमधील डिझेल रस्त्यावर सांडल्याने आगीचे लोट सुमारे 100 ते 200 मीटरपर्यंत पसरले होते. आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, यामध्ये रस्त्यालगतची झाडेही जळून खाक झाली. तसेच आकाशात धुराचे मोठ – मोठे लोट पसरले होते, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण आगीत टँकर पूर्णपणे जळून कोळसा झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यामध्ये डिझेल टँकरच्या ड्रायव्हरचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अद्याप पर्यंत सदरील घटनेत किती जणांची जीवित हानी झाली याची माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि महामार्ग पोलीस दाखल झाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाच ते सात किलोमीटर पर्यंत वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती. आग विझवण्यासाठी गेवराईच्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. परंतु बीड अग्निशामक दलाची गाडी काही तांत्रिक कारणास्तव घटनास्थळी आली नसल्याची माहिती मिळाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles