* शाखाधिकारी कुंडा च्या कारभाराला शेतकरी वैतागले
चौसाळा, दि. १४ (प्रतिनिधी) : चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी खरिपाची पेरणी कुणी उधारी, उसनवारी तर कुणी व्याजाने पैसे घेऊन केली. तसेच खरिपाच्या पिकाच्या मशागत व इतर खर्चासाठी चौसाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत पीक कर्जासाठी फाईल दाखल केल्या. परंतु खरिपाची काढणी झाली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पीक कर्ज मिळालेले नाही. खरिपाची पीक ऐन मोसमात असतानाच अचानक मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने क्षणात शेतातील पिकाचे होत्याचे नव्हते झाले आणि आत्तापर्यंत पिकावर केलेला खर्च मातीत मिसळला अशी परिस्थिती या भागातील शेतकऱ्यांची झालेली आहे. नैसर्गिक संकटाच्या दृष्टचक्रात या भागातील शेतकरी अगोदरच अडकलेला असताना चौसाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाअधिकारी फनिकेश्वर कुंडा यांच्या गलथान कारभारामुळे या भागातील शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढवलेले आहे.
खरिपाची काढणी झाली तरी दीडशे च्या जवळपास शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पीक कर्ज मिळालेले नाही त्यामुळे सदरील शेतकरी हे बँकेत वारंवार हेलपाटे मारून पीक कर्जा विषयी बँकेचे कर्मचारी व शाखा अधिकारी यांच्याकडे विचारणा करत आहेत. परंतु त्यांना बँकेकडून उडवा उडवीशी उत्तरे दिली जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना शेतातील काम सोडून बँकेत चकरा माराव्या लागत असल्याने वेळ व बँकेत येण्या जाण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाची झळ विनाकारण सोसावी लागत आहे. बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी पीक कर्ज विषयी विचारणा केली असता त्यांना आठ दिवसांनी या, चार दिवसांनी या, पुढच्या हप्त्यात या तर कधी फाईल आर आर सी कडे पाठवण्यात आलेल्या आहेत त्या आमच्याकडे आतापर्यंत आलेल्या नाहीत. त्याला आम्ही तरी काय करणार अशा प्रकारची उडवीची उत्तरे मिळत असल्याने परिसरातील शेतकरी बँकेच्या कारभाराला पूर्णपणे वैतागलेले आहेत.
खरिपाच्या पिकासाठी मागणी केलेले कर्ज खरिपाची काढणी होऊनही मिळाले नसले तरी किमान रब्बीच्या पेरणीसाठी तरी पीक कर्ज कामाला येईल. या आशेने या भागातील शेतकरी बँकेत वारंवार चकरा मारत आहेत परंतु त्यांची दखल बँक प्रशासन यांच्याकडून घेतली जात नसल्याने या भागातील शेतकरी बँकेच्या दारात लवकरच आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले व चौसाळा येथील बँकेच्या दारात सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून याबाबत लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे शेतकऱ्यांनी सांगितले.



